आमचे माजी विद्यार्थी ज्ञानदा विद्या मंदिरची मूल्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि त्यापलीकडे नेतात.
आवाज
त्यांच्या शब्दांत
“२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट ला होणारे लेझिम आणि विविध प्रकारचे कार्यक्रम हे माझे खूप आवडीचे होते...आणि आठवण सांगायच झाल तर मला माझी शाळा आणि माझी पूर्ण बॅच आणि त्यांच्यासोबतची मस्ती, अभ्यास ही सगळ खुप मिस करतो.”
राहुल पांडुरंग सोनवणे
२०१२ ची बॅच
क्वालिटी अभियंता, वडाळा
“ज्ञानदा विद्या मंदिर ही आमच्या आयुष्याची भक्कम पायाभरणी करणारी ज्ञानमंदिर आहे. इथे मिळालेले शिक्षण, संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्ये हीच आमच्या यशाची खरी ताकद आहेत. शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, मित्रांसोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण आणि शाळेतील प्रत्येक आठवण आजही प्रेरणेचा स्रोत आहे. आज आम्ही जीवनाच्या वेगवेगळ्या वाटांवर असलो तरी ज्ञानदा विद्या मंदिराने दिलेली शिकवण आणि संस्कार कायम आमच्या सोबत आहेत. या ऋणातून प्रेरणा घेऊन समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा संकल्प हीच आमच्या शाळेला खरी आदरांजली ठरेल.”
मंगेश कांताराम गोपाळे
२००८ ची बॅच
वरिष्ठ व्यवस्थापक, ICICI प्रुडेन्शियल
“माझे शिक्षक मला चांगले संस्कार देतात आणि मार्ग दाखवतात. मित्रांसोबत खेळताना आणि अभ्यास करताना वेळ कधी जातो कळतच नाही. शाळा म्हणजे माझे दुसरे घर आहे. शाळेत मला माझ्यात जे टॅलेंट आहे ते मला माझ्या शिक्षकांनी दाखवले, जरी अभ्यासात कमी असलो तरी बाकी गोष्टीत मला शाळेने खूप घडवले जसे संगीत आणि ते जपायला सुद्धा शिकवले, आज संगीत क्षेत्रात माझे खूप नाव आहे आणि आता मी खूप मोठे मोठे आर्टिस्ट सोबत शो करतो, आपली आवड ही कधीही मारू नये तर तीला जपाव हे मला शाळेने शिकवले, मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे.”
रोशन अशोक कळके
२०१० ची बॅच
संगीत कलाकार आणि KONE एलिव्हेटर
“शाळेत २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टच्या कार्यक्रमांमध्ये आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी किंवा विविध क्षेत्रात मोठे नाव कमावलेले मान्यवर आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी यायचे. ते त्यांच्या आयुष्यातील अनुभव आणि यशाचा प्रवास सांगायचे. त्यांचे विचार ऐकताना माझ्या मनात नेहमी एकच स्वप्न असायचे—'एक दिवस मीही काहीतरी मोठं करेन आणि माझ्या शाळेसाठी नक्की काहीतरी योगदान देईन.' आज देवाच्या कृपेने मला ती संधी मिळाली. माझ्या शाळेसाठी काहीतरी करता आलं, याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. माझं बालपणीचं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं, ही माझ्यासाठी खूप मोठी आणि अविस्मरणीय गोष्ट आहे.”
ज्योत्स्ना कैलाश सुरळकर
२०१६ ची बॅच
व्यवस्थापक, MGM प्रिंट टेक
“ज्ञानदा शाळा माझी शाळा माझा अभिमान. शाळा आपल्याला ज्ञान, शिस्त आणि चांगले संस्कार शिकवून आपल्या आयुष्याला योग्य आकार देते. ती आपल्या प्रगतीचा पाया असून आपल्या बालपणीच्या सुंदर आठवणींचे हक्काचे ठिकाण असते.”
राकेश राजू शिंदे
२००६ ची बॅच
उद्योजक, कॅटरिंग
“माझी शाळा ही ज्ञानाचं मंदिर आहे. आणि माझी शाळा म्हणजे माझं दुसरं घर आहे. येथे मिळालेल्या संस्कारांमुळे माझं व्यक्तिमत्व घडलं. इथल्या शिक्षकांनी मला फक्त अभ्यासच नाही तर जगण्याची कला शिकवली. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ यामुळे शाळेतील प्रत्येक दिवस खास बनतो. शिस्त, परिश्रम आणि एकता याची शिकवण मला इथेच मिळाली. माझी शाळा मला नेहमीच प्रेरणा देते आणि पुढे जाण्यासाठी बळ देते. बाहेरच्या जगात पाऊल टाकल्यावर समजले की शाळेच्या पटांगणात खेळताना आणि वर्गात शिकताना जे आनंद मिळतो तो कुठेही मिळणार नाही. माझ्या यशामागे माझ्या शाळेचा आणि शिक्षकांचा मोठा वाटा आहे. मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे.”
सोपान बाबासाहेब आव्हाड
२०१२ ची बॅच
सहाय्यक व्यवस्थापक, कॉर्ड्स केबल इंडस्ट्रीज
“गुरू विना दैवत नाही अन्य कोणी ! मार्ग दाखवी आम्हा अंधाऱ्या जीवनी !! ज्ञानदा विद्या मंदिर हे माझ्या सारख्या अनेक मुलांना लाभलेले ज्ञान देणारे मंदिर आहे. शाळेत आम्हाला सर्वगुणसंपन्न शिक्षक लाभले हे आमचे भाग्य. अशी शाळा मिळने नाही म्हणुन मी शाळेचा नेहमी ऋणी रहीन.”
किरण गणपत हरड
२००६ ची बॅच
मेकॅनिकल क्षेत्रात व्यवसाय
“आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माझ्या बालमित्रांनो,
नमस्कार.
शाळेच्या स्नेहसंमेलन समारंभासाठी आपल्याच शाळेच्या प्रांगणात पुन्हा पाऊल ठेवताना माझे मन भूतकाळात हरवून गेले. अनेक वर्षांनंतर आपल्या शाळेत येण्याचा आनंद शब्दांत सांगता येणारा नाही. शाळेतील पटांगण, हे वर्ग आणि या भिंती आपल्या बालपणीच्या आठवणींनी भरलेल्या आहेत. या शाळेने आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर संस्कारांची शिदोरी देऊन जगायचे कसे हे शिकवले.
आपल्या प्रत्येक गुरूंनी आपल्यावर केलेले संस्कार आणि दिलेली ज्ञानशिकवण आज आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरत आहे. त्यांनी केलेल्या कौतुकाची थाप आणि प्रसंगी दिलेल्या धाकानेच आज आपल्याला समाजात एक सुजाण नागरिक बनवले आहे.
तसेच, आयुष्यभरासाठी जोडले गेलेले ते मैत्रीचे बंध, शाळेतले डबे वाटून खाणे, मधल्या सुट्टीतली धमाल आणि मित्रांसोबतचा निरागस आनंद आज खूप आठवतो. आज आपण सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहोत. पण आपल्या यशाचा पाया याच शाळेत रचला गेला, हे आपण कधीही विसरू शकत नाही. या शाळेचे आपल्यावर खूप मोठे ऋण आहेत.
या लाडक्या शाळेला आणि आपल्या सर्व आदरणीय शिक्षकांना मी मनापासून वंदन करतो.
शाळेच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद!”
राहूल सुभाष सुतार
१९९९-२००० ची बॅच
खाजगी मर्यादित कंपनीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक
“प्रिय ज्ञानदा विद्या मंदिर,
तुझ्या अंगणात रुजलेले एक छोटेसे बी आज एका वटवृक्षात रूपांतरित झाले आहे, आणि याचे संपूर्ण श्रेय तुझ्याकडून मिळालेल्या विचारांच्या शिदोरीला जाते.
माझ्या आयुष्याच्या या यशस्वी प्रवासात, उद्योगजगताच्या उंच शिखरावर उभे असताना मला नेहमी जाणीव होते की, माझ्या विचारांच्या पाया, ध्येयाची दिशा आणि संघर्षाशी लढा देण्याचे सामर्थ्य हे तुझ्या वर्गातल्या बाकांवरच घडले आहे. तू फक्त अक्षरांची ओळख करून दिली नाहीस, तर स्वप्नांना पंख देऊन त्यांना सत्यात उतरवण्याची जिद्द दिलीस.
शिक्षकांच्या अथांग प्रेमाने आणि मार्गदर्शनाने माझी दृष्टी घडवली, तर तुझ्या शिस्तीने मला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ताठ मानेने जगायला शिकवले. यशाची जितकी शिखरे मी पादाक्रांत करेन, त्या प्रत्येक यशाचा पहिला मान तुझाच असेल.
माझ्या व्यक्तिमत्त्वाला आणि स्वप्नांना आकार देणाऱ्या माझ्या या ज्ञानमंदिराला आणि मला घडवणाऱ्या सर्व आदरणीय शिक्षकांना माझे शतशः प्रणाम!”
सचिन रामभाऊ भगत
२००४ ची बॅच
बीई (मेक), एमबीए · यशस्वी उद्योजक
“माझ्या बालपणाच्या आठवणींच्या पुस्तकातली सगळ्यात सुंदर पाने म्हणजे ज्ञानदा विद्यालय. बालवाडी ते ७ वीपर्यंतचा काळ इथे गेला आणि तो माझ्या आयुष्यातला सर्वात निरागस, सुंदर आणि अविस्मरणीय काळ होता.
ज्ञानदा विद्यालय माझ्यासाठी फक्त शाळा नव्हती; ती माझ्या आयुष्याची पहिली मैत्री, संस्कार आणि असंख्य आठवणींचं घर होतं. आमचे शिक्षक फक्त शिकवत नव्हते, तर प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून घडवत होते.
आमचा डबा हा तर वेगळाच विषय! 😄 प्रत्येकाने मित्रांसोबत डबे वाटून पूर्ण केले आहेत ना, याची शिक्षक आवर्जून काळजी घ्यायचे. ❤️
आणि माझी खास शिक्षा तर आजही आठवते! 😂 गृहपाठ केला नाही किंवा जास्त मस्ती केली की आदेश ठरलेला—
“जा… मुलींच्या मध्ये जाऊन बस!” 🤣
शिक्षकांसाठी ती शिक्षा होती…
पण माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी… आयुष्यभर लक्षात राहिलेली एक अविस्मरणीय आठवण!
माझ्या शाळेतील खोड्यांमध्ये मुलींच्या वेण्या पकडण्याची माझी खास सवयही होती! 😂 गंमत म्हणजे, आजही त्या मैत्रिणी त्या आठवणी हसत-हसत सांगतात. ❤️
पुढे व्हीजेटीआय, मुंबई येथून सिव्हिल अभियांत्रिकी पूर्ण करून जवळपास १६ वर्षे नोकरी केली आणि २०२५ मध्ये स्वतःची कंपनी सुरू केली. आज ती यशस्वीपणे चालवत आहे.
पण आज मी जे काही आहे, त्याची खरी सुरुवात कुठे झाली, तर उत्तर एकच—
“ज्ञानदा विद्यालयात!” ❤️
ज्ञानदा विद्यालयाने मला फक्त शिक्षण दिलं नाही; माणसं दिली, संस्कार दिले, आत्मविश्वास दिला आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा असंख्य आठवणी दिल्या.
मनापासून धन्यवाद, ज्ञानदा विद्यालय! ❤️”
स्वप्निल नरखेडे
२००० ची बॅच
डिरेक्टर, आकारएज स्ट्रक्चर्स प्रा. लि.
“ज्ञानदा विद्या मंदिर,
माझी शाळा, माझा पाया.
मी कृष्णा सोमनाथ नागरे, लोकसत्ता वृत्तपत्रात, मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये चीफ मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
बालवाडीपासून ते दहावीपर्यंतचे माझे सर्व शिक्षण ज्ञानदा विद्या मंदिरमध्येच झाले. या शाळेने मला केवळ अक्षरज्ञान दिले नाही, तर चांगले संस्कार दिले, चांगले शिक्षण दिले आणि समाजात एक जबाबदार, सुशिक्षित नागरिक म्हणून कसे जगावे हे शिकवले.
आज मी जिथे आहे, तिथे पोहोचण्यामागे माझ्या शाळेचा सिंहाचा वाटा आहे. शाळेतील सर्व शिक्षकांनी लहानपणापासून मला आपल्या मुलाप्रमाणे समजून घेऊन घडवले. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला पुढे जाण्यासाठी बळ दिले आणि प्रेरणा दिली.
या सर्वांसाठी मी ज्ञानदा विद्या मंदिर आणि माझ्या सर्व गुरुजनांचा मनापासून ऋणी आहे.
धन्यवाद!”
कृष्णा सोमनाथ नागरे
चीफ मॅनेजर, मार्केटिंग डिपार्टमेंट — लोकसत्ता वृत्तपत्र